आसमंत- श्रीकांत इंगळहळीकर

आजचे पुस्तक : आसमंत- श्रीकांत इंगळहळीकर.
आज मी ओळख करून देणार आहे ती श्रीकांत इंगळहळीकर यांनी लिहिलेल्या 'आसमंत' या पुस्तकाची..!! हे पुस्तक 'करोला पब्लिकेशन, पुणे' यांनी प्रकाशितआहे. यामध्ये लेखकाने आपल्या आसपासच्या निसर्गाचे वर्णन अतिशय ओघवत्या भाषेत केलेले आहे. हे पुस्तक म्हणजे निसर्गनिरिक्षणांवर आधारित असलेल्या लेखांचा संग्रह आहे. यातील काही लेख यापूर्वी 'सकाळ' वृत्तपत्रामध्ये, साप्ताहिक सकाळ आणि महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. लेखकाने आपल्या या पुस्तकात लहानपणापासून निसर्गाशी निर्माण होत गेलेले नाते सांगत अनेकविध अनुभव इथे सांगितले आहेत. लेखकाच्या मते 'आसमंत' आपल्या दाराशी सुरू होतो. आपण त्या आसमंतातील आविष्कार चौकसपणे, संवेदनाक्षम नजरेने पाहिले तर आपल्याला अनेक थक्क करणा-या गोष्टी दिसतात. निसर्ग आपल्याला निरागस आनंद तर देतोच, पण आपल्यातला अहंकार, ताण, मानसिक थकवा कमी करतो. आपण या विश्वासमोर किती क्षुद्र आहोत याची जाणीव करून देतो. असा अभ्यास करताना त्यातील विविधता लेखकाने आपल्या अनुभवातून आणि छायाचित्रातून ललित लेखन प्रकारातून मांडली आहे. आपण हे पुस्तक वाचताना नक्कीच लेखकासोबत अभ्यासूवृत्तीने आपल्या आजूबाजूच्या निसर्गाशी पुन्हा नव्याने ओळख करून घेऊ लागतो. संग्रही असावे असे नितांत सुंदर मराठीतील आणखी एक पुस्तक....आसमंत....!!!

Comments

Popular posts from this blog

वनस्पतींसंबंधीची पुस्तके

शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर

फुलवा - डॉ. श्रीश क्षीरसागर