नक्षत्रवृक्ष- डॉ. शरदिनी डहाणूकर

आजचे पहिले पुस्तक मी निवडले आहे ' नक्षत्रवृक्ष '. हे पुस्तक डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी लिहिले आहे. डॉ. शरदिनी डहाणूकर ह्या मुंबईच्या शेठ जी .एस .मेडिकल कॉलेजमध्ये औषधविज्ञान (Allopathy ) विभागात प्राध्यापक होत्या. पण तरीही आयुर्वेदाविषयी आणि त्यातील उपचारपद्धतींबद्दल त्यांनी विशेष अभ्यास केला आणि PhD (डॉक्टरेट ) सुध्दा प्राप्त केली. साचेबद्ध विषयाचा अभ्यास न करता वेगवेगळया  प्रकारे त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन आणि संशोधन केले. ह्या पुस्तकातील काही लेख  लोकप्रभा मध्ये प्रसिद्ध झालेले होते . त्यांचे अनेक लेख वृत्तपत्रातून, आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून  प्रसिद्ध झालेले आहेत. अनेक पुस्तके  देखील विशेष उल्लेखनीय आहेत. हे पुस्तक ग्रंथाली प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केले आहे.
      ह्या पुस्तकाच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते की  हे पुस्तक ' नक्षत्र आणि त्याचा आराध्यवृक्ष ' ह्यांच्याशी निगडित आहे. जन्म नक्षत्रावरून प्रत्येक राशीचा  एक आराध्य वृक्ष असतो. पंचांगामध्ये आपण पाहिले  तर कोष्टकात (अवकहडा चक्र)  ह्या वृक्षांची नावे दिलेली असतात. ह्या चक्रामध्ये नक्षत्र, नाडी , गण , आराध्यवृक्ष , दान , देवता , तत्त्व इत्यादी माहिती दिलेली असते . ज्यावरून ज्योतिषी पत्रिका तयार करत असतात. नक्षत्र आणि आराध्य वृक्षाचा अभ्यास करताना लेखिका त्यांच्यात असलेला संबंध आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सहज आणि सोप्प्या भाषेत मांडताना दिसते. वनस्पतींचा अभ्यास  किती अंगानी आपण करू शकतो त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. ह्या पुस्तकात लेखिकेने नक्षत्र आणि त्या नक्षत्राशी  निगडित व्यक्तीचे स्वभाव ,  त्या व्यक्तीला होऊ शकणारे आजार आणि त्यावरआराध्यावृक्षाचा होणार उपयोग  ह्यांची अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली आहे.  ह्या पुस्तकातून ज्योतिष आणि आयुर्वेद ह्या दोन्ही प्राचीन शास्त्रातील  वेगवेगळे निष्कर्ष एकमेकांशी कसे निगडित आहेत ह्याचे दर्शन घडते. सोप्या आणि सहज सुंदर मराठी भाषेत असणारे हे पुस्तक सर्वानी आपल्या संग्रही  ठेवावे असेच आहे. आज  लेखिका आपल्यात नसल्या तरी  त्यांचे हे मोलाचे कार्य आपल्या सर्वांसाठी कायमच उपयुक्त  ठरेल.   

Comments

Popular posts from this blog

वनस्पतींसंबंधीची पुस्तके

शतायुषी- रूपाली पारखे-देशिंगकर

फुलवा - डॉ. श्रीश क्षीरसागर